विरोली ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे!

  • --

    --

    --

पिंपळेश्वर देवस्थानाविषयी

श्री क्षेत्र पिंपळेश्वर अहमदनगर शहरातील पारनेर तालुक्यात विरोली हे छोटेसे गाव वसले आहे. गावात लोकसंख्या विरळ मात्र झाडांची संख्या भरपूर, स्वच्छ हवा, कडे, डोंगरदर्या आणि निवांतपणा भरपूर. विशेष म्हणजे अजून निवांत व उंच कड्याच्या पायथ्याला वसलेले श्री क्षेत्र पिंपळेश्वर हे महादेवाचे अतिजागरूक मंदिर. हे मंदिर अतिप्राचीन असून त्याच्या स्थापनेचा इतिहासही अज्ञात आहे. मंदिराच्या समोरच गायमुखातून अखंडपणे गंगा वाहते, ही गंगा काशी तीर्थक्षेत्रावरून येत असल्याचे ही सांगितले जाते. पिंपळास नावाच्या ऋषींची या ठिकाणी समाधी असल्याने या तिर्थक्षेत्राला पिंपळेश्वर हे नाव पडले, आजही पवित्र पंच पिंपळ याची साक्ष देतात.विशेष म्हणजे या ठिकाणे वाहणारी गंगा ही दक्षिण वाहिनी आहे, हिंदू शास्त्रानुसार रक्षाविसर्जनासाठी तीर्थक्षेत्रातील गंगा दक्षिणवाहिनी असावी. त्यामुळे आजमितीस पिंपळेश्वर मंदिराच्या रक्षाविसर्जन कुंडात रक्षाविसर्जन करण्याचा ओघ वाढला आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्षाविसर्जन होऊनही आपणास तिथे अस्थींचा ढिगारा नजरेस पडणार नाही, कारण या पवित्र तीर्थात त्या विरघळून जातात. येथे येणारा प्रत्येक भाविक हा तृप्त होऊनच परततो, ते येथे गायमुखातून होणाऱ्या गंगेच्या मधुर स्वादाने. कुंडाच्या वरती चंदनाचा उगाळून गंध लावण्याची सोय आहे. मंदिराच्या बाजूलाच कपारिच्या पोटात आपणाला एक गुहा दिसेल, पूर्वीच्या काळी ऋषिमुनी याच गुहेत पूर्णत्वाची साधना करत. कीन्हीं गावात समाधिस्त झालेल्या सद्गुरू ओंकार बाबांनीही याच ठिकाणी साधना केली होती. तसेच वारकरी संप्रदायाचे महान संत वै. ह.भ.प नाना महाराज वनकुटेकर यांचे हे आवडते स्थान होते. येथील पवित्र कुंडात स्नान केल्यावर आपनास हलकेसे वाटल्याशिवाय राहणार नाही. आज अनेक मन्दिरांच्या बाजूला व्यापारीकरण आणि गर्दीचा लोट आढळून येतो आणि त्यातच भाविक थकून जातात, मात्र पिंपळेश्वर मंदिर आपणास दर्शनासाठी नेहमी शांतताच प्रदान करेल. ध्यानमार्गातील अनेक योगी या शांतमय ठिकाणी ध्यान करण्यास येतात आणि आपले इप्सित साध्य प्राप्त करतात. एकूणच जर आपणास ईश्वराच्या दर्शनाचा आनंद घ्यायचा असेल, किंवा कोणत्याही प्रकारचे धार्मिक विधी करायचे असतील तर आपण एकदा पिंपळेश्वर मंदिरास भेट द्यायलाच हवी.

--
विरोली ग्रामपंचायत